महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन
मुंबई-करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३० जूनपर्यंत कायम असणार आहे. यादरम्यान अर्थचक्र पुन्हा रुळावर आणण्याच्या हेतूने राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केले आहेत. एकीकडे राज्य सरकार ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करत असताना करोनाचा फैलाव वाढत असल्याने भिवंडीत १५ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. १८ जून ते ३ जुलैपर्यंत भिवंडी शहर पूर्पणणे बंद असणार आहे. करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता प्रशासनाने कठोर लॉकडाउन जाहीर केला आहे.
भिवंडी शहरात दाटीवाटीची वस्ती असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणं कठीण होत आहे. करोनाचा फैलाव वाढत असल्याने महापौर प्रतिभा पाटील यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा क़डक लॉकडाउन जाहीर केला पाहिजे असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनीच पाठिंबा दिला. आयुक्तांनीही यासाठी परवानगी दिली आहे.
यादरम्यान शहरातील सर्व रस्ते पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचं गरजेचं असल्याने फक्त मेडिकल आणि दूध, किराणा दुकानं ठराविक वेळेसाठी सुरु राहतील असं सांगितलं आहे. याबाबत पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला कळवण्यात आलं असल्याचं प्रतिभा पाटील यांनी सांगितलं आहे. भिवंडी शहरात मंगळवारी संध्याकाळपर्यंत करोनाचे ६५० रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.