चकलांबा व तलवाडा शाळा इमारत बांधकामासाठी २ कोटीचा निधी मंजुर
विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नातून होणार नवी इमारत
गेवराई, दि.१६ (प्रतिनिधी) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांना नवीन इमारती मिळाव्यात म्हणून विजयसिंह पंडित यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे चकलांबा आणि तलवाडा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. नुकत्याच शंभराव्या वर्षात पदार्पण करणार्या चकलांबा जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी सध्या एक कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजुर करण्यात आले असून आवश्यकते प्रमाणे इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले. त्यांनी यापूर्वी उमापूर, धोंडराईसह इतर शाळांच्या इमारतीसाठी निधी मंजुर केला होता.
चकलांबा जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करणार्या विजयसिंह पंडित यांनी सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक चकलांबा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी सतत पाठपुरावा केला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून निधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली होती. तलवाडा येथील जिल्हा परिषदेच्या इमारत बांधकामासाठी सुध्दा त्यांनी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना विजयसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यातील उमापूर, धोंडराईसह इतर जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजुर केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात अनेक जिल्हा परिषद शाळांना आकर्षक इमारती उपलब्ध झालेल्या आहेत. गेवराई तालुक्यातील चकलांबा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी रुपये तर तलवाडा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी एक कोटी रुपये असे दोन कोटी रुपये जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून मंजुर करण्यात आले असून संबंधित विभागाने त्याला प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. या निधीतील कामे लवकरच सुरु होणार असून दर्जेदार कामे करून घेण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी लक्ष घालण्याच्या सूचना विजयसिंह पंडित यांनी केल्या आहेत. पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद माध्यमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन विकास आराखड्यातून निधी उपलब्ध केल्याबद्दल विजयसिंह पंडित यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. चकलांबा आणि तलवाडा येथील विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी शालेय इमारीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.