करोनाच्या रुग्णांना देण्यात येणारे ‘हे’ औषध होणार बंद ?
नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे तर दुसरीकडे करोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करोनाच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करताना हाइड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अॅझीथ्रोमायसीन या गोळ्यांचा कोर्स दिला जातो. करोनाची सौम्य तसेच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर हे कॉम्बिनेशन प्रभावी ठरल्याचे आतापर्यंत दिसले आहे. पण लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
करोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर एचसीक्यू आणि अॅझीथ्रोमायसीन या कॉम्बिनेशनने उपचार करण्यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या उपचार पद्धतीमध्ये एचसीक्यू कायम राहिल पण अॅझीथ्रोमायसीनचा वापर बंद केला जाऊ शकतो. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) करोना रुग्णांवर उपचारांसाठी ही दोन औषधे सुचवली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालय करोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जातील. करोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरे औषध दिले जाऊ शकते. एचसीक्यूसह अॅझीथ्रोमायसीनच्या वापरामुळे ह्दयावर परिणाम होत असल्याने या गोळीचा वापर थांबवला पाहिजे. त्याच्याजागी डॉक्सीसायक्लीन किंवा अॅमॉक्सीसायक्लीन ही औषधे दिली पाहिजेत. यामुळे ह्दयावर कुठलाही परिणाम होत नाही असे ICMR च्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.