विदेश

मास्कच्या वापरामुळे कोविडच्या दुसऱ्या टप्प्याला प्रतिरोध करणे शक्‍य

मास्कचा वापर 100 टक्‍के लोकांनी केला तर दिसणारा परिणाम अधिक सकारात्मक

लंडन – व्यापक प्रमाणात फेसमास्कचा वापर केला गेला तर कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेला प्रतिरोध करता येणे शक्‍य आहे, असे या संदर्भातील अभ्यासकांनी म्हटले आहे. “जर्नल प्रोसेडिंग्ज ऑफ रॉयल सोसायटी’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये या संदर्भातील अभ्यासाबाबत निबंध प्रसिद्ध झाला आहे.
घरगुती मास्कमुळे परिणामकारकता फारच मर्यादित असू शकते. मात्र त्याचा वापर अनेक लोकांकडून सातत्याने केला गेल्यामुळे प्रादुर्भावाला प्रतिबंध अगदी लक्षणीयरित्या केला जाऊ शकतो, असेही या अभ्यासलेखात म्हटले आहे. जगभरात फेसमास्कचा वापर त्वरित आणि जास्तीत जास्त केला जायला हवा, असे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातील लेखक रिचर्ड स्टटफ्रॉम यांनी जोर देऊन म्हटले आहे.
सोशल डिस्टन्सिंग आणि काही प्रमाणात लॉकडाऊनबरोबर व्यापक प्रमाणात फेसमास्कचा वापर केला गेला तर ही या रोगावरील लस अस्तित्वात येण्याच्या खूप आगोदरपासूनच ही साथ आटोक्‍यात राहील. तसेच आर्थिक व्यवहार सुरू करायलाही मदत होईल, असे स्टटफ्रॉम यांनी म्हटले आहे.
या साथीचा प्रसार एका व्यक्‍तीपासून मोठ्या संख्येत लोकांपर्यंत प्रादुर्भाव कसा पसरतो, याचे वेगवेगळ्या मॉडेलमध्ये संशोधन संशोधकांकडून सुरू आहे. त्यात सर्व मॉडेलमध्ये किमान 50 टक्‍के लोकसंख्येकडून मास्कच्या वापराच्या जोडीला लॉकडाऊनमुळे फैलाव आटोक्‍यात राखता येऊ शकतो, असे स्पष्ट झाले आहे.
जर मास्कचा वापर 100 टक्‍के लोकांनी केला तर दिसणारा परिणाम यापेक्षाही अधिक सकारात्मक असेल. ही साथ पसरण्याच्या पहिल्या 120 दिवसात जरी दुसरी लाट आलेली नसली तरी फेसमास्कच्या व्यापक वापरामुळे या दुसऱ्या लाट प्रतिबंध करता येऊ शकेल, असेही स्टटफ्रॉम यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *