विदेश

WHOचा नवा खुलासा: लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होतो का?

जिनिव्हा, 09 जून : जगभरात कोरोनाचा प्रसार थांबता थांबत नाही आहे. यातच काही देशांनी लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात केली आहे तर, काही देशांमध्ये निर्बंध कायम आहेत. मात्र सर्वांना चिंता होती ती, लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization-WHO) एक चांगली बातमी दिली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार Asymptomatic म्हणजेच लक्षण नसलेल्या रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका कमी आहे. WHOच्या एपिडेमिओलॉजिस्ट मारिया वॅनकर्खोव्ह यांनी सांगितले की, बर्‍याच देशांमध्ये कोरोनाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. निम्म्याहून अधिक एसिंम्प्टोमॅटिक प्रकरणे नवीन प्रकरणांमध्ये आढळून येत आहेत, परंतु या संक्रमित रुग्णांकडून संसर्ग होण्याची धोका कमी आहे. WHO कडून आलेले हे विधान आधी आलेल्या बातम्यांपेक्षा वेगळे आहे. जेव्हा मार्च आणि एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमध्ये एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांची संख्या वाढली होती, तेव्हा असे मानले जाते की अशा संसर्गांमुळे Covid-19 झपाट्यानं पसरत आहे.

एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांचा चीननं कोरोना यादीत नव्हता केला समावेश

एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांवरून चीनवरही टीका केली जात आहे. कारण चीननं सुरुवातीच्या काळात वुहानमधील एसिंम्प्टोमॅटिक रुग्णांना कोरोना यादीमध्ये सामिल केले नाही. नंतर या लोकांचा समावेश करण्यासाठी चीनने आणखी एक यादी जाहीर केली. परंतु आता WHOच्या निवेदनात असे स्पष्ट झाले आहे की लक्षणं नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची फारच कमी प्रकरणे आहेत.

WHOला अमेरिकेनं केलं लक्ष्य

विशेष म्हणजे कोरोना साथीच्या संदर्भात WHOच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर थेट हल्ला केला होता. WHO चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. अमेरिकेने WHOला मोठ्या प्रमाणात निधी देण्यासदेखील बंदी घातली आहे. मात्र, अमेरिकेने हे निधी बंद केल्याचे सांगितल्यानंतर काही दिवसांनंतर चीनने WHOला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे आश्वासन दिले.

मास्कवरून वाद सुरू

इतकेच नाही तर मास्क वापरण्याबाबत WHO च्या मार्गदर्शक सूचनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. विशेष म्हणजे जानेवारीमध्ये चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून WHO ने मास्क वापरण्याचा आग्रह धरला नाही. अलीकडेच संस्थेने मास्क संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. परंतु यात देखील संघटनेतर्फे स्पष्टपणे सांगितले गेले आहे की कोरोनाच्या बचावामध्ये केवळ मास्कवर अवलंबून राहणे शक्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *