10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाला बोर्डाकडून उत्तर
मुंबई, 8 जून : कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाचा इतर क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरीही 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल कधी लागणार? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यातच सोशल मीडियावरून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत विविध तारखा पसरवल्या जात आहेत. यामुळे संभ्रम अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनीच पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे.
‘सोशल मीडियावर राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या निकालांबाबत देण्यात येत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निकालाबाबत राज्य मंडळाकडून अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात येईल,’ असा खुलासा शकुंतला काळे यांनी केला आहे. याबाबत ‘लोकसत्ताने’ वृत्त दिलं आहे.
कधी सुरू होणार देशातील शाळा?
अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.