उच्च शिक्षणांतर्गत अभ्यासक्रमाच्या सीईटी अर्जासाठी 8 जून शेवटची तारीख
पुणे – राज्य शासनाच्या उच्च शिक्षणांतर्गत असलेल्या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी अर्ज करण्यास 8 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवीनंतरच्या ह्या प्रवेश परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार असून, त्याचा सुधारित वेळापत्रक राज्य सीईटी सेलकडून जाहीर करण्यात येणार आहे.
तीन व पाच वर्षीय विधी अभ्यासक्रम, बीएड, एमएड, बीएस्सी-बीएड, बीए-बीएड, बीपीएड, एमपीएड ही अभ्यासक्रमे उच्च शिक्षणाअंतर्गत येतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेतली जाते. या सीईटीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मात्र करोनामुळे यापूर्वीच अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. करोनामुळे अर्ज भरण्यास अडचणी आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन राज्य सीईटी सेलने केले आहे.
या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या तारखा पुढे ढकलण्यात आले आहे. सीईटी जुलै महिन्यात घेण्यात येणार असल्याचे राज्य सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. साधारण 15 ते 24 जुलै दरम्यान सीईटी घेण्याचे नियोजन आहे. त्याबाबत अधिकृत तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य सीईटी सेलने पत्रकाद्वारे कळविले आहे.