मान्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू
पुणे (प्रतिनिधी): निसर्ग चक्रीवादळाची तिव्रता उद्यापर्यत(गुरूवार) कमी होताच मान्सूनची पुढील वाटचाल सुरू होणार आहे. दरम्यान आज कर्नाटकाच्या मध्य अरबी समुद्रात दाखल होईल. त्यानंतर येत्या दोन दिवसात कोकण आणि गोव्यात सुद्धा तो दाखल होईल असा अंदाज आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा परिसरात असणारा पावसाचा जोर हा आणखी आठवडाभर कायम राहणार आहे.
अरबी समुद्रात असलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे वाऱ्याला खेचून आणल्याने मान्सून नियमित वेळेवर एक जून रोजी केरळ मध्ये दाखल झाला आहे. मान्सूनने सोमवारी केरळच्या कन्नूर व तामिळनाडूच्या कोईमतून कन्याकुमारीपर्यतचा भाग व्यापला. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मान्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे. केरळाचा संपुर्ण भाग व्यापून मान्सून आता कर्नाटकात दाखल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा सहा ते सात जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.