ऑनलाइन वृत्तसेवा

प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार;मग पालिका निवडणुका कधी होणार?2026 लाच नवीन कारभारी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नगरविकास विभागाने राज्यात गेल्या दोन दिवसांत महापालिका, नगर पंचायत, नगर परिषदांच्या प्रभागरचनांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर शुक्रवारी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांकडून आतापासून मोर्चेबांधणी करण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.

मे अखेरपर्यंत राज्यातील मुदत संपलेल्या ३२ जिल्हा परिषदांसह ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुसार ग्रामविकास विभागाने प्रभागरचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नेमकी सदस्य संख्या किती असावी याची निश्चिती केल्याने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रभागरचना तयार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात येईल. त्यानुसार नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. या समितीत उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, प्रभागरचनेशी संबंधित असलेले तहसीलदार, संगणकतज्ज्ञ आणि आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

तहसीलदारांनी तयार केलेला कच्चा आराखडा प्रभागरचना समितीसमोर ठेवण्यात यईल. त्यानुसार प्रभागरचनेचे प्रारूप तयार करून जिल्हाधिकारी, पंचायत समितीच्या कार्यालयांसह वेबसाइटवर ती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार अंतिम प्रभागरचना १८ ऑगस्टपर्यंत प्रसिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. वेळापत्रकानुसार, ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मुंबई महापालिका, राज्यातील अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल. राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पुढे जाऊ शकते, असे समोर येत आहे. प्राप्त वेळापत्रकानुसार ९ टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. तर ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाणार आहे. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील. यानंतर निवडणूक कार्यक्रम हाती घेण्यात येईल. त्यासाठी काही कालावधी जाईल आणि नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुका होतील

अंतिम प्रभाग रचना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल

त्यानंतर प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात येईल

प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील

ही प्रक्रिया साधारणतः दीड महिन्यात पूर्ण होईल

ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पू्र्ण होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल

महापालिका-नगरपालिका निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!