बीडचा सुपुत्र अविनाश साबळे पुन्हा चमकला;आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये मिळवले गोल्ड मेडल
आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. दक्षिण कोरियातील गुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेला धावपटू अविनाश साबळेने ऐतिहासिक कामगिरी बजावली. त्याने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात तब्बल 36 वर्षांनंतर भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याने अंतिम फेरीत 8:20.92 सेंकदाची वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
अविनाश या स्पर्धेत पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी 1975 साली हरबैल सिंग यांनी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 1989 मध्ये दिना राम यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.