बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बाजार समिती स्थापन होण्याचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत तालुकास्तरावर 65 नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यांत बाजार समिती स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील 68 तालुक्यांत बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती (Agriculture Produce Market Committee) स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री बाजार समिती योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3 तालुके वगळून उर्वरित 65 तालुक्यांत महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील तरतुदींनुसार मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात येत असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई उपनगरातील तीन तालुके शहरी भागात येतात त्यामुळे या ठिकाणी समिती स्थापन व्यवहारिकदृष्ट्या संयुक्तिक नाही असे शासनाचे मत आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली या भागांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे. या तीन तालुक्यांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित 65 तालुक्यांत बाजार समित्या स्थापन करण्याचे शासनाने नक्की केले आहे.
‘या’ तालुक्यांत होणार बाजार समिती
दरम्यान, सध्या बाजार समिती नसलेल्या कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग), संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड (जि. रत्नागिरी), उरण, टाळा, सुधागड-पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हासाळा (जि. रायगड), अंबरनाथ (जि. ठाणे), तलासरी, जवाहर, मोखाडा, वाडा, विक्रमगड (जि. पालघर), पेठ, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक), एरंडोल, मुक्ताईनगर, भडगाव (जि. जळगाव), भातकुली, चिखलदरा (जि. अमरावती), वेल्हा (जि. पुणे), नागपूर ग्रामीण (जि. नागपूर), मोहाडी, साकोली (जि. भंडारा), सालेकसा (जि. गोंदिया), धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कुरखेडा, कोर्ची, एटापल्ली, भामरागड (जि. गडचिरोली),
बल्लारपूर, जिवती (जि. चंद्रपूर), अर्धापूर (जि. नांदेड), खुलताबाद, सोयगाव (जि. छ. संभाजीनगर), शिरुरकासार (जि. बीड), सोलापूर दक्षिण (जि. सोलापूर), महाबळेश्वर (जि. सातारा), कवठे महांकाळ, जत, कडेगाव (जि. सांगली), पन्हाळा, शाहुवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा (जि. कोल्हापूर) या 65 तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.