महाराष्ट्रमुंबई

राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरु

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात येणार आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या कक्षाचे पालकमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री आपापल्या जिल्ह्यात उद्घाटन करत आहेत.

जिल्ह्यात वैद्यकीय कक्ष सुविधा, आता मंत्रालयात जायची गरज नाही

गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा तसेच अर्ज आणि पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण किंवा नातेवाईकांना मंत्रालयात जावे लागू नये, या दृष्टीने या कक्षाची रचना करण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता आणि 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या कक्षांच्या प्रभावी कार्यान्वयनासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

मुख्यमंत्री सहायता कक्ष काय करणार मदत?

मुख्यमंत्री या कक्षामार्फत रुग्ण व नातेवाईकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची सद्यस्थिती, मदतीसाठी पात्र असलेल्या आजारांची माहिती तसेच संलग्न रुग्णालयांची यादी मिळणार आहे.
त्यामुळे अर्जदारांना वेळ व पैसे वाचतील आणि मदत तत्काळ पोहोचेल.
याशिवाय कक्षातर्फे जनजागृती, रुग्णालयातील भेटी, गरजूंना मदत, आपत्तीच्या ठिकाणी उपस्थिती आणि निधीसाठी देणग्या वाढवण्याचे प्रयत्नही करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून आरोग्य सहाय्यासाठी अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्यवस्था उभारण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्जासाठी काय लागतात कागदपत्रे?

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Email id – aao.cmrf-mh@gov.in) यावर तुम्हाला अर्ज करता येतो. त्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.

  1. अर्ज (विहीत नमुन्यात)
  2. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
  3. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
  4. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
  5. रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
  6. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
  7. अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC रिपोर्ट आवश्यक आहे.
  8. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
  9. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री
    करावी.
    अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाद्वारे तात्काळ पाठवावे लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *