ऑनलाइन वृत्तसेवा

वर्ग-2 मध्ये किती प्रकारच्या जमिनी येतात?कोणत्या जमिनींचं वर्ग-1मध्ये रुपांतर करता येतात!

सातबारा उताऱ्यावर नमूद असलेली भूधारणा पद्धती शेतकरी व जमीनधारकांसाठी महत्त्वाची असते. मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनींबाबत अनेकांना संभ्रम असतो. या बातमीत आपण भूधारणा प्रकार, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनींचे स्वरूप, तसेच काही जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येतात का?

महाराष्ट्रातील भूधारणा प्रकार

महाराष्ट्रात भूधारणा पद्धती चार प्रमुख गटांत विभागल्या जातात:

1) भोगवटादार वर्ग-1
या जमिनींवर कोणतेही सरकारी निर्बंध नसतात. जमिनीचा मालक स्वेच्छेने विक्री करू शकतो.

2) भोगवटादार वर्ग-2
या जमिनींवर सरकारी नियंत्रण असते. मालकाने जर ही जमीन हस्तांतरित करायची असेल, तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी आवश्यक असते. या जमिनींना “प्रतिबंधित” किंवा “नियंत्रित” जमिनी असेही संबोधले जाते.

3) शासकीय पट्टेदार जमीन
ही जमीन सरकारच्या मालकीची असून, ती विशिष्ट कालावधीसाठी म्हणजेच 10, 30, 50 किंवा 99 वर्षांसाठी भाडेपट्टीवर दिली जाते.

4) महाराष्ट्र शासनाची जमीन
या जमिनी पूर्णपणे सरकारी मालकीच्या असतात. शासन विविध प्रकल्पांसाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी या जमिनी राखून ठेवते.

भोगवटादार वर्ग-2 मधील 16 जमिनी कोणत्या?
भोगवटादार वर्ग-2 प्रकारातील जमिनी स्वतंत्रपणे विकता येत नाहीत. या जमिनी स्थानिक महसूल प्रशासनाच्या मंजुरीनेच हस्तांतरित करता येतात. या जमिनींची माहिती गाव नमुना 1 (क) मध्ये नोंद असते. खालील 16 प्रकारच्या जमिनी भोगवटादार वर्ग-2 मध्ये मोडतात.

1)मुंबई कुळ कायदा 1948 अंतर्गत विक्री झालेल्या जमिनी
2) वेगवेगळ्या इनाम आणि वतन जमिनी (देवस्थान वगळून)
3) शासन योजनांद्वारे भूमीहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी
4) गृह निर्माण संस्था व औद्योगिक उपयोगासाठी दिलेल्या जमिनी
5) सिलिंग कायद्यानुसार जास्तीच्या जमिनींचे पुनर्वाटप केलेल्या जमिनी
6) महानगरपालिका व ग्रामपंचायतींना राखीव ठेवलेल्या जमिनी (गुरचरण, सार्वजनिक वापर इत्यादीसाठी)
7) देवस्थान इनाम जमिनी
8) आदिवासी खातेदारांच्या जमिनी
9) पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रदान केलेल्या जमिनी
10)भाडेपट्टीवर दिलेल्या शासकीय जमिनी
11) भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमिनी
12)खाजगी वन संपादन कायद्यानुसार चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या जमिनी
13) भूमीधारी हक्कांनुसार प्राप्त जमिनी
14)सिलिंग कायद्यानुसार अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी
15)भूसंपादन कायद्यानुसार संपादित केलेल्या जमिनी
16) वक्फ जमिनी

कोणत्या जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करता येत नाहीत?
भोगवटादार वर्ग-2 मधील काही जमिनी वर्ग-1 मध्ये रूपांतरित करता येत नाहीत. महसूल तज्ज्ञांच्या मते, खालील जमिनी कायमस्वरूपी प्रतिबंधित असतात:

1) सिलिंग कायद्यांतर्गत येणाऱ्या अतिरिक्त जमिनी
2) महापालिका किंवा नगरपरिषदांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी
3) देवस्थान इनाम जमिनी
4) आदिवासी खातेदारांच्या जमिनी
5) खाजगी वन संपादन कायद्यांतर्गत असलेल्या जमिनी
6) जास्तीच्या जमिनींसाठी दिलेली सूट असलेल्या जमिनी
7) भूसंपादन कायद्यांतर्गत संपादित केलेल्या जमिनी
8) वक्फ जमिनी

दरम्यान, भोगवटादार वर्ग-2 अंतर्गत असलेल्या जमिनींचे हस्तांतरण सहजपणे करता येत नाही. शासनाने अशा जमिनींवर विशिष्ट निर्बंध लागू केले आहेत. काही जमिनींचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करता येऊ शकते, परंतु अनेक जमिनी कायमस्वरूपी भोगवटादार वर्ग-2 मध्येच राहतात. त्यामुळे अशा जमिनींच्या खरेदी-विक्रीपूर्वी सर्व कायदेशीर अटी तपासून घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *