ऑनलाइन वृत्तसेवा

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 3 टक्क्यांनी डीए वाढ;7 महिन्यांचा फरक मिळणार

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे यासंदर्भातला शासन निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या महिन्यापासून वाढीव डीए मिळणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सरकारने काय निर्णय घेतला?

राज्य सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात 1 जुलै 2024 पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर 50 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या डीए दरामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशे, म्हणजे हा वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात मिळणार थकबाकी डीए

या शासन निर्णयानुसार वाढीव डीए 1 जुलै 2024 पासून लागू होईल. हा वाढीव डीए फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाईल. म्हणजेच 1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 या सात महिन्यांचा वाढीव डीए फेब्रुवारी 2025 महिन्याच्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या डीएमध्ये वाढ करावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्नही चालू होते. दरम्यान, सरकारने सध्याच्या महागाईचा विचार लक्षात घेता डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शासकीय कर्मचारी स्वागत करत आहेत. सात महिन्यांचा थकित डीए आता फेब्रुवारी महिन्याच्या पगारात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

17 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

दरम्यान, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने हा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 50 टक्के असलेला महागाई भत्ता 53 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाचा राज्यातील एकूण 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वाढीव पगार मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *