दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लाडक्या बहिणींचे पैसे दोन दिवसात खात्यामध्ये येतील, असे सुतोवाच दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लाडक्या बहिणींवा खूशखबर दिली.
लाडक्या बहिणींना दोन ते तीन दिवसांत डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे माजी मंत्री मुनगंटीवार यांनी साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले. लाडकी बहीण योजनासंदर्भात सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेय. निकष बदलले जाणार, काही महिला अपात्र ठरणार, यासारख्या चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. त्यासंदर्भात मुनगंटीवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील दोन दिवसांत १५०० रूपये खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आलेय.
लाडकी बहीण योजनांचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत. या संदर्भात मी अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. ही योजना कुठेही बंद पडणार नाही. या विरोधात काँग्रेसपक्ष कुठे चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असतील तर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार करा. पात्रता आणि निकषांत बदल होणार नाहीत. फक्त अफवा पसरवत आहेत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
डिसेंबरचा हप्ता कधी जारी होणार?
WCD अधिकाऱ्यांनी सांगितले की “नवीन महिला व बालकल्याण मंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता जारी केला जाईल. महायुतीने वाढीव अनुदान जाहीर केल्याने त्यासंदर्भात नव्या मंत्र्यांना सूचना द्याव्या लागतील. मंत्र्यांनी सूचना केल्यानंतर जीआर जारी केला जाईल. यानंतर वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरित करायची की नाही हे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरवले जाईल आणि त्यानंतर एक जीआर जारी केला जाईल. शिवाय, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प जारी करावा लागेल”, असेही ते म्हणाले.