ऑनलाइन वृत्तसेवानवी दिल्ली

पीएफधारकांना क्लेम केलेली रक्कम थेट एटीएममधून काढता येणार

पीएफ अर्थात प्रोव्हिडंट फंड, कर्मचारी वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहिन्याला ठराविक रक्कम ही पीएफ खात्यात जमा केली जाते. प्रत्येक कर्मचाऱ्याला हीच रक्कम भविष्यात विविध कारणांसाठी कामी येते.

ईपीएफओ पीएफधारकांना चांगल्या सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी आग्रही असते. त्यानुसार ईपीएफओकडून अनेकदा आवश्यक बदल करण्यात आले आहेत. पीएफ खात्यातून आधी रक्कम काढण्यासाठी ऑफलाईन प्रोसेस करावी लागायची,जी फार किचकट तसेच सर्वसामन्यांच्या समजेच्या बाहेरची होती. मात्र गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले. त्याचा फायदा जसा इतरांना झाला तसाच पीएफधारकांनाही झाला.

पीएफ खात्यातील रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा पर्याय पीएफधारकांना मिळाला. मात्र हक्काच्या रक्कमेसाठी पीएफधारकांना जवळपास 20 दिवस प्रतिक्षा करावी लागते. आता ही प्रतिक्षा नाहीशी होणार आहे. आता नववर्षापासून पीएफ खात्यातील रक्कम एटीएमद्वारे काढता येऊ शकते. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमित्रा डावरा यांनी बुधवारी 11 डिसेंबरला याबाबतची माहिती दिली. कामगार मंत्रालयाकडून देशातील असंख्य कर्मचारी वर्गाला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आयटी यंत्रणेत आवश्यक बदल केले जात आहेत.

सुमित्रा डावरा काय म्हणाल्या?

पीएफधारकांकडून करण्यात आलेला क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच अनेक किचकट गोष्टी साध्या आणि सोप्या करण्याचा प्रयत्न आहे. आता पीएफधारक क्लेम केलेली रक्कम थेट एटीएममधून काढू शकतो. यामुळे या व्यवहारात आधीच्या प्रोसेसच्या तुलनेत मानवी हस्तक्षेप कमी होईन आणि सर्व सोप होईल’, असं सुमित्रा डावरा यांनी नमूद केलं.

एटीएममधून तिच रक्कम काढता येईल, ज्यासाठी पीएफधारकाने क्लेम केला असेल. पीएफधारकांना खात्यातील सर्वच रक्कम काढता येत नाहीत. तसेच ठराविक रक्कम काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. तसेच विशेष स्थितीतच (लग्न, घर आणि इतर) सर्व रक्कम काढता येते. पीएफधारक ईपीएफओ वेबसाईट आणि उमंग अ‍ॅपद्वारे रक्कम काढण्यासाठी अर्ज करु शकतात.

‘सिस्टम सातत्याने अपग्रेड होत आहे. दर 2 ते 3 महिन्यांनी तुम्हाला महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. जानेवारी 2025 पर्यंत मोठा बदल होईल, याबाबत मला विश्वास आहे. आपल्याकडे तेव्हा ईपीएफओकडे आयटी 2.1 व्हर्जन असेल’, असं सुमित्रा डावरा यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *