महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला समोर, 90-90-90 जागा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नवी दिल्लीत आहेत. बाळासाहेब थोरात यांनी नवी दिल्लीत बोलताना महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला सांगितला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात देखील थोरात यांनी भाष्य केलं आहे. मित्रपक्षांना आम्ही 18 जागा दिलेल्या आहेत. आता तीन राजकीय पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरुन 90-90-90 वर पोहोचला असल्याचं त्यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात म्हणाले की आम्ही चर्चा करत आहोत, आमचे उमेदवार सक्षम आहेत त्यांच्याबाबत चर्चा झाली आहे. सीईसी पुढे ही नाव आम्ही ठेवणार आहे. महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत कोठेही करणार नाही, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. राज्याची निवडणूक आहे, त्यामुळं काही अडचणी असतात त्या आम्ही सोडवत असतो, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात यांनी पुढे म्हटलं की 18 जागा आम्ही मित्रपक्षांना ठेवल्या आहेत. त्यातून किती सुटतील बघू असं देखील ते म्हणाले. आमचा 85-85-85 चा फॉर्म्युला आता 90-90-90 झाला आहे. काँग्रेस 100 च्या पुढे जाणार का याची अजून बेरीज केली नाही, असं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
काँग्रेसनं काल पहिल्यांदा 48 जागांची यादी जाहीर केली. यामध्ये विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. महाविकास आघाडीकडून कालपर्यंत 158 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील उर्वरित जागांवर उमेदवार कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.