महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात मिळणार

वृत्तसेवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राज्यातील कोट्यवधी महिलांना प्रतिमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी या योजनेची सुरुवात केली आहे.

या योजनेअंतर्गत आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकदाच 3000 रुपये जमा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी तसेच बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत भाष्य केले होते. भाऊबीज म्हणून राज्य सरकारतर्फे नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील, असे अजित पवार म्हणाले होते. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते. कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते. म्हणजेच महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्यांचे पैसे दिले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *