फॉरेन्सिक ऑडिटमधून ज्ञानराधा मल्टिस्टेटची होणार पोलखोल
ठेवीदारांना आकर्षक व्याज देण्याचे अमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या सर्व व्यवहारांचे फॉरन्सिक ऑडिट केले जाणार आहे. यासाठी आर्थिक गुन्हे शाखा शासनाच्या यादीवरील सनदी लेखापालांकडून दरपत्रक मागवणार आहे.
या फॉरेन्सिक ऑडिटमधून ज्ञानराधा पतसंस्थेच्या व्यवहारांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेमध्ये ठेवीदारांची झालेली फसवणूक व त्यानंतर दाखल झालेले गुन्हे याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
पोलिसांनी तपासात ज्ञानराधाच्या मुख्य शाखेतून सर्व्हरचे व सॉफ्टवेअरचे काम पाहणाऱ्यांकडून मूळ हार्डडिस्क जप्त केल्या आहेत. या हार्ड डिस्कमधील डेटा तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवला गेलेला आहे. यामध्ये शासनाच्या यादीवरील मान्यताप्राप्त सनदी लेखापालांची नेमणूक करुन ऑडिट होणार आहे. या ऑडिटमधून ज्ञानराधा पतसंस्थेतील व्यवहाराची सर्व माहिती समोर येवू शकते, त्यामुळे तपासाला वेग येणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार लवकरच ही प्रक्रिया केली जाणार आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटकडून झालेल्या फसवणूकप्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीवरुन जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात ४३ गुन्हे नोंद झालेले आहेत. पोलिसांनी सुरेश कुटे, संचालक आशिष पाटोदकर यांना अटक केली होती. त्यानंतर आतापर्यंत ४ कर्मचारी, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, वैभव कुलकर्णी यांना अटक केलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, एकूण ५२ शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये १ लाख ६५ हजार ८७२ जणांच्या मुदत ठेवी आहेत. तर, २ लाख ६ हजार ६९७ जण बचत खातेदार आहेत. दोन्हींचे मिळून या पतसंस्थेत ३ हजार ७१५ कोटी ५८ लाख ७२ हजार ६३३ रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत.