मुंबई

गहिनीनाथ गडासाठी 2 कोटी 67 लाख तर स्वा सावरकरांच्या थीमपार्क साठी 15 कोटींची तरतूद

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .

राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासाच्या सुमारे 305 कोटी 63 लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला.

तसेच,पंढरपूर येथील दर्शन मंडप व दर्शन रांग या सुविधेसाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या कामांचाही समावेश आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या सरकारमधील मंत्री तसेच उच्चपदस्थ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

अर्थसंकल्पात तसेच वेळावेळी आश्वासित केल्याप्रमाणे आपण राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून देत आहे. त्याप्रमाणे या तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांच्या विकासासाठी तातडीने नियोजन करण्यात यावे. यासर्वच ठिकाणची कामे दर्जेदार आणि गूणवत्तापूर्ण व्हावीत याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.

पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविक आणि पर्यटकांसाठी दर्शन मंडप व दर्शन रांग सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 129 कोटी 49 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. भगूर (जि. नाशिक) येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या चाळीस कोटी रुपयांच्या प्रस्तावास तसेच पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील देशातील एकमेद्वितीय अशा मंगळग्रह देवस्थानाच्या 25 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशय-मौजे मुनावळे येथील जलक्रीडा पर्यटन सुविधा (ता.जावळी, जि.सातारा)साठी 47 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. हे सर्व प्रस्ताव पर्यटन विभागाने सादर केले. त्याबाबत सविस्तर सादरीकरण व त्यातील प्रकल्प आणि सुविधांची माहिती सादर केले.

ग्रामविकास विभागाने सादर केलेल्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच श्री क्षेत्र गहिनीनाथगड (जि. बीड) च्या विकास आराखड्यातील 2 कोटी 67 लाखांच्या कामांस मान्यता देण्यात आली. याशिवाय मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब या सशस्त्र दहशतवाद्यास जीवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केंडबे (ता. जावळी) येथील मुळगांवी स्मारक उभारण्यासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीसाठी बैठकीत मान्यता देण्यात आली.

याशिवाय नगर विकास विभागाने नागपूर शहरातील आराखडे सादर केले. त्यातील लक्ष्मीनारायण शिवमंदिर- नंदनवनच्या 24 कोटी 73 लाखांच्या विकास आराखड्यास, कुत्तेवालेबाबा मंदिर आश्रम-शांतीनगरसाठी 13 कोटी 35 लाख रुपये आणि मुरलीधर मंदिर पारडी विकास आराखड्यासाठी 14 कोटी 39 लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *