महाराष्ट्र

लाडकी बहिण योजनेचे पैसे याच महिना अखेर मिळणार

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सातत्याने चर्चा सुरु आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर काही महिला या अद्याप प्रतीक्षेत आहेत. त्यातच आता महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

अदिती तटकरे यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबद्दलची एक मोठी अपडेट दिली. ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत अर्ज भरले होते, त्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसेही लवकरच दिले जाणार आहेत. तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्या महिलांना लवकरच या योजनेचे पैसे अकाऊंटमध्ये येणार आहेत. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी छाननी सुरु आहे, असे अदिती तटकरे यांनी सांगितलं.

दोन कोटींपेक्षा अधिक महिला पात्र


“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज आले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ देण्यात आले आहे. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जांची छाननी सुरु आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटींपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील”, असे अदिती तटकरे म्हणाल्या.

“याच महिन्यात लाभ मिळणार”


“आमच्या विभागाचा अंदाज आहे की अडीच कोटी महिला पर्यंत ही योजना विस्तारली जाईल. सुरुवातीला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र सातत्याने अर्ज प्राप्त होत आहे. त्यामुळे आम्ही ही मुदत वाढवली. दर महिन्याला अधिकाधिक महिलांपर्यंत 1500 रुपयांचा लाभ पोहोचावा असे आमचे उद्दिष्ट आहे, असेही अदिती तटकरेंनी सांगितले.

त्यासोबतच ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज भरले आहेत. त्यांना जुलै आणि ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्याचा लाभही लवकरच दिला जाईल. तर सप्टेंबर महिन्यात आलेल्या पात्र अर्जांनाही याच महिन्यात लाभ मिळणार आहे”, असे अदिती तटकरे यांनी सांगितले.

“राजकारण आणण्याचे कारण नाही”


महिलांची सुरक्षा महत्त्वाचा विषय आहे. मात्र, महिलांसाठीची योजना एक भाग आहे आणि महिलांना सुरक्षितता देणं दुसरा भाग आहे. राज्यातील महिला भगिनी सुरक्षित राहावं हे सर्वांचच उद्दिष्ट आहे. यात राजकारण आणण्याचे कारण नाही. महाराष्ट्र सरकारने शक्ती कायदा प्रस्तावित केला होता. महाराष्ट्राच्या प्रस्तावित शक्ती कायद्याच्या बहुतांशी बाबी केंद्र सरकारच्या कायद्यात आहेत. उर्वरित बाबी आम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत, असेही अदिती तटकरेंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *