राज्यात विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्याची शक्यता!
निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआ याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, महायुती या धक्क्यातून सावरत पुन्हा कमबॅक करणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
मात्र, विधानसभा निवडणूक नक्की कधी होणार, मतदान आणि मतमोजणीची तारीख काय असणार, याबाबत निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अद्याप कोणतीही वाच्यता करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणूक (VidhanSabha Election 2024) ऑक्टोबर महिन्यात न होता नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी दिवाळी संपल्यानंतरच पार पडेल, असे समजते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी संपल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपन्न होऊ शकते. त्यानंतर साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात नियमानुसार नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्त्वात येणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घ्यायचे ठरवले तर त्यासाठी साधारण 12 ऑक्टोबरच्या आसपास सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. तेव्हापासून राज्यात लगेच आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहित धरला तरी 26 नोव्हेंबरपूर्वी नव्या विधानसभेची स्थापना होणे शक्य आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागेल, अशी चर्चा होती. तसे झाले असते तर विधानसभा निवडणुका दिवाळीपूर्वी म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या असत्या. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून तुर्तास तशी कोणतीही हालचाल दिसत नाही. सरकारी पातळीवरही कारभार हा नेहमीच्या गतीने सुरु आहे. अन्यथा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नव्या प्रस्ताव आणि फाईल्सच्या मंजुरीचा वेग कैकपटीने वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शासकीय पातळीवर अत्यंत वेगाने काम सुरु असते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महायुती सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही त्यापैकी एक आहे. याशिवाय, आणखी काही सरकारी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी होऊन त्याचा लाभ नागरिकांना आता कुठे मिळायला सुरुवात होईल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्यातच लागू झाली असती तर सरकारला या योजनांच्या प्रसिद्धीसाठी फारसा वेळ मिळाला नसता. याउलट ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यास महायुती सरकारला योजनांच्या प्रचारासाठी किमान 15 जास्त दिवस मिळतील, अशी चर्चा आहे.
याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक झाल्यास आतापासूनच प्रचाराला सुरुवात करावी लागेल. राज्यातील पावसाचा हंगाम अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. याशिवाय, श्रावण महिना आणि पुढील दिवाळीपर्यंतचे दिवस हे सणासुदीचे आहेत. त्यामुळे या काळात विधानसभा निवडणूक नको, असा काहीसा सूर राजकीय पक्षांमध्ये आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.