पुण्यात पुराचा वेढा;अनेक भागात पूरस्थिती,रस्त्यावर कमरेइतके पाणी
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. बुधवारी मध्यरात्रीपासून पुण्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहरात ठिकठिकाणी झाडपडीच्या घटना देखील घडल्या आहेत.भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली पडली आहे. तर कोरेगांव पार्क, बर्निंग घाट नजीकच्या परिसरातील घरांची पडझड झाली आहे. वारजे येथील स्वामी विवेकानंद सोसायटी व फ्युचेरा सोसायटीत शिवणे, सदगुरू सोसायटीत, सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी व इतर तीन सोसायटीमध्ये, नदीपाञ रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीकच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे.
याशिवाय गंजपेठ, चांदतारा चौक – शिवाजीनगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. सद्यस्थितीत अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान कार्यरत असून पाणी शिरलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याकामी कार्यवाही करीत आहेत.
पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे; खडकवासल्यातून ९ हजार ४१६ क्युसेक वेगाने विसर्ग !
मुसळधार पाऊस कायम असल्याने खडकवासला धरणातून आज सकाळी ७.०० वाजल्यापासून मुठा नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या लगत असणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी !