दहावी-बारावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात?
मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे आता विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतात. पण यंदा लॉकडाऊन स्थितीमुळे ते लांबणीवर पडले आहेत. यंदा हे निकाल जुलै २०२० च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. अर्थात राज्य शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाच्या तारखांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
यंदा लॉकडाऊन स्थितीमुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात करोना संक्रमणाची स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गंभीर आहे. विशेषत: मुंबई, पुणे जिल्ह्यांमध्ये करोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परिणामी रुग्णसंख्या वाढत आहे.
दहावीचा भूगोल विषयाचा पेपरही लॉकडाऊनच्या कचाट्यात सापडला होता आणि अखेरीस रद्द करण्यात आला. सुरुवातीला शिक्षण विभागाने सांगितले की उत्तरपत्रिका तपासनीसांपर्यंत पोहोचवण्यासाठी साधनेच नाहीत, त्यामुळे मूल्यांकनाचे काम लॉकडाऊननंतरच होईल.
शिक्षण विभागाने नंतर दहावी आणि बारावीच्या पेपरतपासणीचे काम करणाऱ्या शिक्षकांना शाळेतून घरी उत्तरपत्रिकांची ने-आण करण्याची परवानगी दिली. तत्पूर्वी, मे महिन्यात उच्चा न्यायालयानेही शिक्षण मंडळाला बोर्डाचा निकाल १० जून २०२० पर्यंत लावण्याचे निर्देश दिले. देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन स्थिती हळूहळू अनलॉक करण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळही आता निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लावण्याच्या तयारीत आहे.
सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.