ऑनलाइन वृत्तसेवा

स्थानिक स्वराजसंस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीला मान्यता

पवित्र संकेतस्थळातर्फे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबवण्यास मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येणार आहे.

शिक्षक भरती प्रक्रियेत त्यात ११ हजार ८५ पदांवर उमेदवारांची निवड करण्यात आली. राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे शिक्षक भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. मात्र आयोगाने लोकसभा निवडणुकीचे मतदान झालेल्या जिल्ह्यांत शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया करण्यास परवानगी दिली. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक जाहीर झाल्याने या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नियुक्ती प्रक्रिया आणखी पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती प्रक्रियेला मान्यता मिळाल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षण विभागाने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबवण्यास मान्यता मिळाली आहे. २५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल.

समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *