बीडमध्ये अखेर तुतारीच वाजली;पंकजाताई मुंडे यांचा पराभव,बजरंग सोनवणेंचा साडे सहा हजार मतांनी विजय
राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असून बजरंग सोनवणे यांचा 6 हजारांहून अधिक मतांनी विजय झाला आहे.
बीडमध्ये सामाजिक विषयावरून झालेलं मतांचं धृवीकरण आणि जरांगे फॅक्टर यामुळे पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला अशी चर्चा आहे.
बीड लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झाली. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत होती. जरांगे फॅक्टरमुळे बीड लोकसभा निवडणूक चुरशीची बनली असे मानले जात होते. त्यामुळेच सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या फेरीत पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली. शेवटपर्यंत दोन्ही उमेदवार आघाडी आणि पिछाडीवर जात होते. अखेर राज्यात सर्वात शेवटी बीडचा निकाल जाहीर झाला आणि बजरंग सोनवणे विजयी झाले.
2019 मध्ये कशी होतं बीडचं गणित
बीड लोकसभा मतदारसंघात प्रीतम मुंडे विद्यमान खासदार आहेत. गेल्यावेळी 2019 च्या निवडणुकीत प्रीतम मुंडे मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकल्या होत्या. त्यांना एकूण 6,78,175 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 5,09,807 मते मिळाली होती. त्यांचा प्रितम मुंडे यांनी सोनवणे यांचा 1,68,368 मतांनी पराभव केला होता. भाजपने यावेळी प्रितम मुंडेंऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी दिली.
2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंचा दीड लाख मतांनी विजय
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा बीड बालेकिल्ला होता. गोपिनात मुंडे हे बीडमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून गोपीनाथ मुंडे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी त्यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. गोपिनाथ मुंडे यांना एकूण 6,35,995 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांना 4,99,541 मते मिळाली होती. 2014च्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेआधीच गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.
2009 मध्येही गोपीनाथ मुंडेचां मोठा विजय
2009 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे गोपीनाथ मुंडे खासदार झाले होते. त्यांना 5,53,994 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बाबुराव कोकाटे (आडसकर) यांना 4,13,042 मते मिळाली होती गोपिनाथ मुंडे यांनी रमेश कोकाटे यांचा 1,40,952 मतांनी पराभव केला होता.