ऑनलाइन वृत्तसेवा

मतदार यादीतून नावे वगळलेल्यांना पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्र. सहा भरणे आवश्यक

मतदार यादीतून नावे वगळलेल्यांना पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्र. सहा भरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एका शहर-जिल्ह्यातील व्यक्ती दुसऱ्या शहर- जिल्ह्यात (नवीन मतदारसंघ) राहायला गेला असल्यास त्यांनाही मतदार यादीतील पत्ता बदलता येतो.पण, त्यासाठी त्यांना ‘voter helpline’वर जाऊन फॉर्म क्र. आठ भरणे जरुरी आहे.

राज्यातील अनेक मतदारसंघातील शेकडो मतदारांना स्वत:कडे मतदानकार्ड असतानाही मतदान करता आलेले नाही. चूक कोणाची याचा तपास होईलच, पण त्या मतदारांना पुन्हा यादीत समाविष्ट होण्यासाठी फॉर्म नं. सहा भरून द्यावा लागणार आहे. ते मतदार आता देखील ‘voter helpline’वर अर्ज करू शकतात. त्यावरील निर्णय मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होईल. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्याच्या विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, नावे वगळलेल्यांसह नवीन मतदारांनी (१८ वर्षे पूर्ण झालेले) नाव नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. पण, नवमतदारांना कधीही नाव नोंदविण्याची सोय निवडणूक आयोगाच्या ॲप किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहे. लोकसभेचा अनुभव पाहता आता सर्वच ‘बीएलओं’ना पारदर्शकपणे काम करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई होवू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

आवश्यक कागदपत्रे जोडून करा अर्ज

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, यादीतून नाव वगळले असल्यास पुन्हा समाविष्ट करणे, पत्ता बदलणे, नावात दुरुस्ती करण्याची सोय निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर केलेली आहे. पण, त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागतो.

एखादा व्यक्ती कामानिमित्त किंवा शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात किंवा नवीन मतदारसंघात राहायला गेला असल्यास त्यांना त्याठिकाणी मतदान करता येते. पण, त्यासाठी त्या मतदाराला बदलेला पत्ता म्हणजेच रहिवासी पुरावा जोडून ‘voter helpline’वर फॉर्म क्र. आठ भरून देणे आवश्यक आहे. त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही कागदपत्रांची गरज पडत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *