जिल्ह्याचा विकास करायचा असल्यास कमळाचं बटण दाबून पंकजाला निवडून द्या-नितीन गडकरी
बीड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा पुढील काही तासांतच संपणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघातील अंबेजोगाई येथे जाहीर सभा घेऊन पंकजा मुंडेंना निवडून देण्याचं आवाहन केलं.
बीडमधील सभेत नरेंद्र मोदींनी दिवंगत गोपीनाथ मुंडेंची आठवण जागवली. त्यानंतर,काल पंकजा मुंडे यांच्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी, त्यांनीही गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवत पंकजा मला लेकीसारखी असल्याचं म्हटलं. गडकरींच्या या वाक्यावर उपस्थितांनी जल्लोष करुन दाद दिली. विकसित भारत, विकासकामे, काँग्रेसचा कार्यकाळ, मोदींचा कार्यकाळ यासह जातीय कारणावरही गडकरींनी भाष्य केलं.
नितीन गडकरींनी पंकजा मुंडेंच्या बालेकिल्ल्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची आठवण काढली. पंकजा मला मुलीसारखी आहे. पंकजामध्ये कर्तृत्व आहे, केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून ती मोठी नाही तर तिच्यात काम करण्याची धमक आहे. तिच्यामध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व हे, नेतृत्व आहे. आता तुम्हाला तुमच्यासाठी संघर्ष करणारी, वेळ पडल्यास स्वपक्षातही संघर्ष करणारी पंकजा आहे. पंकजा खासदार झाल्यास महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान देऊ शकते. या जिल्ह्याचा, मतदारसंघाचा विकास करायचा असल्यास कमळाचं बटण दाबून पंकजाला निवडून द्या, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं.