बीड

बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू; जाळपोळीच्या घटना

बीड जिल्हयात मराठा समाजास सरसकट कुणबी आरक्षण देण्याबाबतच्या अनुषंगाने जिल्हयातील विविध भागात आंदोलन, उपोषण चालू आहेत. दिनांक 29.10.2023 च्या मध्यरात्रीपासून या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले आहे. जिल्हयात परिवहन महामंडळ व इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनास आग लावण्याचे प्रकार घडले आहेत.आणि ज्याअर्थी आज दि. 30.10.2023 रोजी आंदोलकांनी विविध शासकीय कार्यालयांवर मोर्चे काढून कार्यालये बंद केली व काही ठिकाणी कार्यालयास आगी लावणे व दगडफेक करणे असे प्रकार घडले आहेत.यामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आणि ज्याअर्थी बीड जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णयाप्रत मी आले आहे.

त्याअर्थी, वेळेअभावी सर्व संबंधीत यांना नोटीस बाजवून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने, मी दिपा मुधोळ मुंडे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी,बीड मला प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये एकतर्फी बीड जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटरच्या हद्दीपर्यंत तसेच सर्व राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारवंदी लागू करत आहे.


सदरचा आदेश दिनांक ३०.१०.२०२३ रोजी माझ्या सही शिक्यानिशी दिला असल्याचे जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे यांनी आदेशात म्हटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *