आज 72 वर्षे पूर्ण झाले लाडक्या लालपरीला
बीड
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी म्हणजेच लालपरीला आज 72 वर्षे पूर्ण झाली. 1 जून 1948 रोजी अहमदनगर ते पुणे पहिली बस धावली.
बेडफोर्ड नावाच्या कंपनीची ही बस नगरहून सकाळी ठीक 8 वाजता पुण्याच्या दिशेने निघाली. त्यावेळी बस पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी प्रवासाचे तिकीट फक्त अडीच रुपये इतके होते. ही बस चालवण्याचा पहिला मान किसन राऊत या चालकाला मिळाला होता तर लक्ष्मण केवटे हे बसचे वाहक होते. विशेष म्हणजे या बसची बॉडी पूर्णतः लाकडी होती तर छप्पर हे कापडी होते.
त्याकाळी अवैध वाहतूक जोरात सुरू असल्या कारणाने त्यांना या बसमुळे तोटा बसणार होता. त्यामुळे बसवर हल्ला होण्याची देखील भीती होतीच. त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्यात प्रवेश होताच पोलीस बंदोबस्तात शिवाजीनगर जवळील कॉर्पोरेशन जवळ असलेल्या शेवटच्या स्टॉप पर्यंत आणण्यात आली.