राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही”, शरद पवार असं का म्हणाले?
“अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कालपर्यंत अजित पवार यांच्या गटाविरोधात दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले.
पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मताचे समर्थन केले. तसेच दादा आमचे नेते आहेत. या सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे देखील पवार यांनी समर्थन केले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार तर्कवितर्कांना उधाण आले आहे.