मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान मराठवाड्यात देखील गेल्या दोन-तीन दिवसांत अनेक भागात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे.
तर आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असून, उर्वरित जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी बरसतील. राज्यात सर्वत्र दमदार पाऊस होत असताना मराठवाड्यात मात्र कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा…
मराठवाड्यात गेल्या तीन-चार दिवसांत अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे दमदार पाऊस पडतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. मात्र, असं असले तरीही मराठवाड्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. त्यामुळे आगामी काळात लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मराठवाड्यात अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
मराठवाड्यातील आतापर्यंतचा पाऊस
औरंगाबाद 03.4 मिमी,
जालना 2.60 मिमी
परभणी 00 मिमी
नांदेड 3.05 मिमी
हिंगोली 03 मिमी
बीड 0.1 मिमी
धाराशिव 1.9 मिमी
लातूर 4.6 मिमी
प्रशासनाने केलेलं आवाहन.
गावात पूरस्थिती निर्माण झाल्यास अथवा होण्याची शक्यता असल्यास घरातील घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.
गावात अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ तहसील, पोलीस, नगरपालिका प्रशासनास कळवावे.
गावात, घरात जंतुनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्या.
पूरस्थितीत उंच ठिकाणी जावे तसेच जाते वेळी सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावेत. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करुन जावे.
पूरस्थिती असेपर्यंत पाळीव प्राणी, जनावरे उंच ठिकाणी बांधण्यात यावीत. चुकूनही पाळीव प्राणी , इतर जनावरे यांना नदी काठी, ओढ्या काठी बांधू नये.
कुटुंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहिल याची काळजी घ्या.
पुरामध्ये अडचणीत सापडला असाल तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करा), कोणी व्यक्ती वाहत जात असेल तर दोरीच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, पूरस्थितीत घाबरुन जाऊ नका, प्रशासनांच्या सूचनांचे पालन करा.
काय करु नये?
पूर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नका.
पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका, तसेच पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नका.
दुषित, उघड्यावरील अन्न-पाणी टाळा. शक्यतो उकळलेले पाणी आणि सुरक्षित अन्न सेवन करा.
सुरक्षित ठिकाणी राहा आणि विद्युत् तारांना स्पर्श करु नका.
पोहता येत असेल तरच बुडणाऱ्या व्यक्तींना वाचवा परंतु अपरिचीत आणि खोल पाण्यात जाऊ नका.
पूरपरिस्थितीत नदी, नाले, पूल, धरण इत्यादी ठिकाणी विनाकारण गर्दी करु नका