बीडचा अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी पात्र
बीडचा अविनाश साबळे ऑलिम्पिकसाठी पात्र
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे याची 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे
सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केलं. अविनाशही ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करुन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी मेहनत घेत आहे.
अविनाश साबळेनं रविवारी पोलंडमध्ये खेळवण्यात आलेल्या सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 8:11.63 वेळ नोंदवून सहावं स्थान पटकावलं आहे. आपलं नाव सहाव्या स्थानी नोंदवत अविनाश साबळे 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्यानं आठ मिनिटांत 11. 63 सेकंदांमध्ये पुरुषांच्या 3 हजार मीटर स्टीफलचेस स्पर्धेत अंतर गाठलं आहे आणि यातून त्याला दुसऱ्यांदा ऑलिम्पिकची संधी मिळाली आहे. 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात पॅरिस या ठिकाणी होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये तो सहभागी होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या मांडवा गावातील अविनाश साबळे याने टोकियो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (Commonwealth Games 2022) देखील चांगली कामगिरी केली होती. रयाबीत डायमंड लीग स्पर्धेत त्याने 300 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत 8:12:48 सेकंदाची वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला होता, तर अविनाशनं आत्तापर्यंत 9 वेळा स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. दुसऱ्यांदा अविनाश साबळे याची ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्यानं सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
महाराष्ट्राच्या अविनाश साबळे यानं बर्मिंगहॅममधल्या (Birmingham) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास घडवला होता. त्यानं तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या स्टीपलचेस शर्यतीत अविनाशनं जिंकलेलं भारताचं आजवरचं पहिलं पदक ठरलं. या शर्यतीत अविनाश साबळेनं आठ मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ दिली. त्याचा हा आजवरचा नववा राष्ट्रीय विक्रम ठरला होता. अविनाशनं रबात डायमंड लीगमधला आठ मिनिटं 12.48 सेकंदांचा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम आज मोडीत काढला. अविनाश साबळे हा मूळचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो भारतीय सेनेत दाखल झाला आहे.
घरती परिस्थिती बेताची, तरीही अविनाशनं गाठलंय यशाचं शिखर
अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. अविनाश आता धावण्याच्या स्पर्धेमध्ये यशाचं एक-एक शिखर सर करतोय आणि त्यासाठी त्याला त्याच्या कुटुंबाची देखील मोलाची साथ मिळाली आहे. मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी आणि सरावासाठी वेळप्रसंगी व्याजानं पैसे काढले आणि त्याचे शिक्षण आणि सराव चालू ठेवला. लष्करामध्ये अविनाशला नोकरी लागली, तरीही त्यातला खेळाडू शांत बसाला नाही, त्यानं आपली जिद्द सोडली नाही. आता अविनाश दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी करुन इतिहास रचण्यासाठी अविनाशला शुभेच्छा देत आहेत(साभार-गोविंद शेळके)