देशात उष्णतेची लाट?हवामान बदलांमुळं नागरिक हैराण;मान्सून लांबणीवर
राज्यातील नागरिकांना हवमानाचा आणखी एक मारा सहन करावा लागणार आहे. तो म्हणजे उकाड्याचा. महाराष्ट्रातील तापमान आता हळुहळू वाढण्यास सुरुवात झाली असून, किनारपट्टी भागामध्ये हवेत सामान्यहून अधिक आर्द्रतेच्या प्रमाणाची नोंद करण्यात आली आहे. किंबहुना 17 मे पासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जाऊ शकते. ज्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह कोकण आणि मुंबईतही तापमानाच 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित असेल
महाराष्ट्रात उकाडा वाढत असतानाच देशातही काही अंशी अशाच परिस्थितीची नोंद केली जाऊ शकते. देशात सध्याच्या घडीला उष्णतेची लाट येणार नसली तरीही कमाल तापमान मात्र 40 अंशांच्याच घरात राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली आणि नजीकच्या भागामध्ये पुढील दोन दिवस धुळीचे वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, उत्तरेच्या पर्वतरांगांमध्ये पश्चिमी झंझावात वाढत असल्यामुळं राजस्थानवर चक्रिवादळसदृश वारे घोंगावताना दिसत आहेत. त्यामुळं तापमान काहीसं वाढू शकतं. 24 तासांमध्ये देशाच्या पूर्वोत्तर भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो. तर, राजस्थान, हरियाणाचा दक्षिण पट्टा आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये धुळीचं वादळ येऊ शकतं. केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो.
स्कायमेट आणि भारतीय हवमानशास्त्र विभागानं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी देशात मान्सूनचं येणं आणखी लांबणीवर पडलं आहे. केरळमध्ये सहसा SW मान्सून 2023 ची सुरुवात 1 जून रोजी होते. पण, यंदा मात्र ती 4 जून रोजी होण्याची शक्यता आहे. तर, स्कायमेटच्या म्हणण्यानुसार मान्सून 9 जून रोजी महाराष्ट्रात तर 15 जूनपर्यंत मुंबईच्या वेशीवर धडकण्याची चिन्हं आहेत. मोका चक्रिवादळानं निर्माण केलेल्या परिस्थितीमुळं मान्सूनचा प्रवास काहीसा दिरंगाईनं होत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.