शिक्षकांच्या बदल्या लांबणार;शासननिर्णय रद्द; सरकारकडून अभ्यासगटाची स्थापना
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी यापूर्वी राज्य शासनाने काढलेले शासननिर्णय रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे पुढील वर्षाच्या बदल्या लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या कोरोनामुळे गेले दोन वर्षे झालेल्या नव्हत्या. चालू शैक्षणिक वर्षामध्ये जवळपास संपूर्ण वर्षभर शिक्षकांची बदल्यांची प्रक्रिया सुरू राहिली होती. अद्यापि ती प्रक्रिया सुरूच आहे. येथे एप्रिल महिन्यापासून शिक्षकांच्या बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र, आता बदल्यांचा शासननिर्णय रद्द करण्यात आल्यामुळे नवीन शासननिर्णय येईपर्यंत शिक्षकांना बदल्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मार्च अखेरपर्यंत निवेदने स्वीकारली जाणार असल्याने त्यानंतर अभ्यासगट योग्य त्या शिफारसी करेल. शासनाने अभ्यासगटाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर शासननिर्णय काढण्यात येईल व त्यानंतरच शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे या प्रक्रियेसाठी किती कालावधी लागणार आहेत, हे निश्चित नसल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.