ऑनलाइन वृत्तसेवा

मराठवाड्याला गारपीटीचा तडाखा;वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू

राज्यात सलग पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसला आहे.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झालेत. अशातच पुढील तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मराठवाड्याला गारपीटीचा तडाखा

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारीही गारपीट, अवकाळी पावसाचा कहर सुरूच होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे

उखळी (ता. गंगाखेड) येथील बाळासाहेब बाबूराव फड (६०), परसराम गंगाराम फड (४०), साडेगाव (ता. परभणी) येथील आबाजी केशव नहातकर, शेळगाव (ता. सोनपेठ) येथील ओमकार भागवत शिंदे (१५) यांचा मृतात समावेश आहे.

तर इतर चार जण वीज अंगावर पडल्याने जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीसह सोयगावमध्येही वादळी पाऊस, गारपीट झाली. त्यामुळे वाघूर नदीला पूर आला होता. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ते रखडले आहेत.

पुढील ३ दिवस धोक्याचे

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. २० मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चांगलेच धास्तावलेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे. तर विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगांव, आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची अधिक शक्यता अधिक जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *