निवडणुका दीर्घ काळ रखडल्या;पालिका निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मंगळवारी पुन्हा लांबणीवर गेली आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस.नरसिंहा व न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे अन्य महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी झाल्याने निवडणुकांबाबतच्या याचिकांवर मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही.
सुनावणीची नवीन तारीख लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकांसंदर्भातील याचिका न्यायालयाच्या मंगळवारच्या मुख्य कार्यक्रमपत्रिकेत चौथ्या क्रमांकावर होत्या. त्यामुळे निवडणुकांबाबत आज निर्णय होण्याची अपेक्षा होती. पण दिवसाच्या कामकाजाच्या ठरवून देण्यात आलेल्या क्रमानुसार सुनावणी अपूर्ण राहिलेल्या (पार्ट हर्ड) कार्यक्रम पत्रिकेतील ३७-३८ आणि १२ ते १८ क्रमांकावरील प्रकरणांवर आधी सुनावणी झाली व नंतर क्रमानुसार सुरू झाली. त्यामुळे निवडणुकांबाबतच्या याचिकांवर वेळेअभावी मंगळवारी सुनावणी झाली नाही. अर्जदारांच्या वकिलांनी न्यायालयास या याचिकांवर सुनावणीची विनंती सकाळी केली होती. तेव्हा मंगळवारी सुनावणी न झाल्यास ती लवकरात लवकर घेतली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग व सदस्य संख्येतील वाढ व ती पुन्हा पूर्ववत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून काढून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय आदी मुद्दय़ांवर अनेक याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुका दीर्घ काळ रखडल्या आहेत.