शहरांच्या विकासासाठी देशाजवळ सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्ती-पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज विविध विकास कामांचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी अखेर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं.
मुंबईत विकास कामं जलद गतीने करण्यासाठी भाजप आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबई महापालिकेवर भाजपला सत्ता द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत 2014 पासून विकासकामांना गती मिळाली. पण मधल्या काळात म्हणजेच महाविकास आघाडीच्या काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
येणाऱ्या आगामी वर्षात मुंबईचा कायापालट होईल. प्रत्येकासाठी मुंबईत राहणं सुविधेचं होईल. याशिवाय आजूबाजूच्या जिल्ह्यांवरुन मुंबईत येणं-जाणं सुलभ होईल. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास, जुन्या चाळींचा विकास सगळ्या गोष्टी आता ट्रॅकवर येत आहेत. मी त्यासाठी शिंदे-फडणवीस यांना अभिनंदन करतोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मुंबईच्या रस्त्यांना सुधारण्यासाठी जे काम सुरु झालंय ते डबल इंजिन सरकारचा निश्चय दाखवतो. आम्ही प्रदूषणपासून स्वच्छता प्रयत्न प्रत्येक सुविधेसाठी काम करत आहोत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“शहरांच्या विकासासाठी देशाजवळ सामर्थ्य आणि राजकीय इच्छाशक्ती याची कमतरता नाही. पण आम्हाला एक गोष्ट समजायला हवी. मुंबई सारख्या शहरात प्रोजक्टला तोपर्यंत गती मिळणार नाही जोपर्यंत स्थानिक पालिका प्राथमिकता तेज विकासाची नसणार”, असं मोदी म्हणाले.
“जेव्हा राज्यात विकासासाठी समर्पित सरकार असते, जेव्हा शहरात सुशासनासाठी समर्पित शासन असेल तेव्हा हे काम वेगाने होतं. त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
मुंबईच्या विकासासाठी बजेटची काहीच कमी नाही. फक्त मुंबईच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी लागायला हवी. तो पैसा भ्रष्टाचारात लागेल, विकासाला रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचा विकास कसा होईल?”, असा सवाल मोदींनी केला.
“मुंबईकर त्रास सोसत राहिले, शहर विकासासाठी याचना करत राहिले, पण ही स्थिती मुंबईत आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कधीच होऊ शकत नाही”, असं मोदी म्हणाले.
“मी मुंबईकरांकडे जबाबदारी ही गोष्ट सांगतोय, भाजप, एनडीए सरकारने विकासासाठी राजकारण आणलं नाही. विकास हेच आमची प्राथमिकता आहे. आम्ही विकास कामांना कधीच ब्रेक लावत नाही. पण आम्ही मुंबईत असं वारंवार होताना पाहिलं आहे”, अशी टीका त्यांनी केली.
“आमच्या प्रत्येक कामात अडचणी आणल्या गेल्या. असं पुन्हा होऊ नये यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईपर्यंत सगळ्यांची ताकद लागायला हवी. एक ताळमेळची व्यवस्था व्हावी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं, या भाषणात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टाळ्या वाजवल्या. काय म्हणाले फडणवीस? ‘मोदीजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यात डबल इंजिन सरकार आलं. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून जनतेनं डबल इंजिन सरकार दिलं होतं, पण काहींनी बेईमानी केली, त्यामुळे जनतेच्या मनातलं सरकार बनलं नाही.
पण बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली. तुमच्या आशिर्वादाने महाराष्ट्राच्या जनतेचं सरकार बनलं’, असं फडणवीस म्हणाले.
टक्केवारीमुळे कामं रखडली होती. 25 वर्षात मुंबईला काहीच दिलं नाही या मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्घाटनही तुम्हीच केलं, हे नवीन कल्चर आलं आहे. धारावीचाही पुनर्विकास होणार आहे, हे तुमच्यामुळे शक्य झालं आहे. याचं भूमिपूजन आणि लोकार्पणही तुमच्याहस्ते होईल. तुमचे आशिर्वाद गरजेचे आहेत’, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
हा कार्यक्रम मोदींच्या हातून होऊ नये ही काही लोकांची इच्छा होती- एकनाथ शिंदे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठप्प झालेल्या कामांना खऱ्या अर्थाने चालना देण्याची; लोकोपयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, त्यातून लोकांची सुटका करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वामुळे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत केलं.
मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरुवात आजपासून झाली आहे. येत्या दोन वर्षांत मुंबईचा कायापालट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, असं त्यांनी म्हटलं.
“ऑक्टोबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मेट्रोचं भूमिपूजन केलं होतं. आज त्यांच्याच हस्ते लोकार्पण होतं आहे. हा दैवी योग आहे.”
काही लोकांची अपेक्षा, इच्छा होती की हा कार्यक्रम मोदींच्या हातातून होऊ नयेत. पण नियतीसमोर काही चालत नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सहा महिन्यांत हे सरकार एवढं काम करतंय, तर पुढच्या दोन वर्षांत किती काम करेल, या विचाराने काही लोकांची धडधड वाढलीये, अस्वस्थता वाढली आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.