विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त निव्वळ अफवा!पत्नी आणि मुलीने दिली हेल्थ अपडेट
मुंबई: मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी रात्रीपासून वाऱ्याच्या वेगाने पसरले. सोशल मीडियावर या हरहुन्नरी अभिनेत्याला श्रद्धांजलीही अर्पण केली जात आहे. मात्र अभिनेत्याच्या कुटुंबीयाने असं काही झालं नसल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या पत्नी वृषाली यांच्या संपर्क साधला असता त्यांनी विक्रम यांच्या निधनाचे वृत्त फेटाळले. त्यांच्या मुलीनेही अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.
वृषाली यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यात सुधारणा होते आहे की नाही होत आहे की तो प्रतिसाद देत नाही आहे यावरुन डॉक्टर उद्या सकाळी काय करायचे ते ठरवलतील.’ बुधवारी उशिरा त्यांनी विक्रम यांच्या तब्येतीबाबत अशी प्रतिक्रिया दिली होती.
वृषाली यांनी खुलासा केला की, विक्रम गोखलेंना ५ नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी असे सांगितले की, ‘त्यांच्यात थोडी सुधारणा झाली पण पुन्हा तब्येत बिघडली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. या क्षणी त्यांचे विविध अवयव निकामी झाले आहेत.
विक्रम गोखलेंच्या पत्नीने असेही नमूद केले की त्यांच्या पतीचे वय ७७ वर्षे आहे, कारण जवळपास सर्वच ठिकाणी त्यांचे वय ८२ सांगितले जात आहे. त्यांनी अशी माहिती दिली की त्यांची सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहणारी मुलगीही भारतात पोहोचली आहे, त्यांची दुसरी मुलगी मुंबईत राहते. या दोघीही पुण्यात दाखल झाल्या आहेत. लॉकडाऊनदरम्यान विक्रम गोखले मुंबईतून पुण्यामध्ये शिफ्ट झाल्याची माहिती मिळाली होती.
दरम्यान त्यांच्या मुलीनेही याची पुष्टी केली आहे की अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले नसून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, ते अद्याप लाइफ सपोर्टवर आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले जात आहे.