आता खंडग्रास चंद्रग्रहण बघण्याची संधी:कधी आणि किती वाजता?
नुकतेच २५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळाल्यानंतर देशातून आणि महाराष्ट्रातून ८ नोव्हेंबरला पुन्हा खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. देशात पूर्वेत्तर भागात सर्वाधिक ९८% आणि ३ तास ग्रहण पाहावयास मिळेल तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल, अशी माहिती अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून ०५.३० वाजता तर मुंबई येथून ०६.०१ वा. चन्द्रोदयातच ग्रहण सुरु होईल आणि सर्व ठिकाणी ०७.२६ वा ग्रहण संपेल. महाराष्ट्रात पूर्व प्रदेशात गडचिरोली येथे ७०% टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ % ग्रहण दिसेल.
विदर्भातून ग्रहण विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातून ५.३० वाजता चन्द्रोदयातच ग्रहणाला सुरूवात होईल. इथे चंद्र ७०% पृथ्वीच्या सावलीने झाकाळला दिसेल. चंद्रपूर येथे ०५.३३ वाजता ग्रहण दिसेल, येथे ६०% भाग ग्रस्तोदित असेल. ग्रहण मध्यकाळ लगेच ०५.३५ वाजता तर ग्रहण शेवट ०७.२६ वाजता होईल. पश्चिमेकडील जिल्ह्यात काही सेकंदाच्या फरकाने उशिरा ग्रहण दिसेल. शेवटी बुलढाणा येथे ०५.४५ वाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि शेवट ०७.२६ वाजता होईल. येथे १ तास ४१ मिनिटे ग्रहण दिसेल आणि चंद्र २५ % ग्रस्तोदित असेल. सर्व ठिकाणी चंद्र क्षितिजावर १० डिग्रीवर आल्या नंतरच चांगले ग्रहण पाहता येईल.
८ नोव्हेंबर २०२२ ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका, येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगविताना खग्रास स्थिती असेल परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारताबाहेर ८ तारखेला भारतीय वेळेनुसार पारी ०१.३२ वाजता छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. ०२.३९ वाजता खंडग्रास ग्रहणाला सुरुवात होईल. ०३.४६ वाजता खग्रास ग्रहणाला सुरुवात होईल तर ०५.११ मिनिटाने खग्रास ग्रहण समाप्त होईल. ०६.१९ वाजता खंडग्रास ग्रहण समाप्त तर ०७.२६ वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल.
ग्रहणाचा काळ ?
ग्रहणाचा छायाकल्प काळ २.१४ तास खंडग्रास काळ २.१५ तास खग्रास काळ १.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ५.५४ तास असेल. भारतातून चंद्रोदया सोबतच ग्रहण लागलेले असेल आणि ०७.२६ वाजता ग्रहण संपेल. पूर्व भारतात मोठे ग्रहण दिसेल तर पूर्व – पश्चिम रेखांशा नुसार ग्रहण (ग्रस्तोदित भाग ) लहान होत जाईल. सूर्य आणि चंद्र ह्यांचे मध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली असता चंद्रग्रहण होत असते. ह्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. गडद छायेत ( Umbra) पूर्ण चंद्र आल्यास खग्रास, काही भाग आल्यास खंडग्रास ( penumbra) तर उप् छायेत चंद्र आल्यास छांयाकल्प ( Antumbra) चंद्रग्रहण होते. दरवर्षी दोन तरी चंद्रग्रहणे होतात .
पुढील वर्षी चार ग्रहणे….
२०२३ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यात २०/४/२०२३ रोजी खग्रास सूर्यग्रहण, ५/६ मे २०२३ रोजी छायाकल्प चंद्रग्रहण, १४/१०/२३ रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण आणि शेवटी २८, २९ ऑक्टोबर २०२३ रोजी खंडग्रास चंद्रग्रहनांचा समावेश आहे. पृथ्वीवरची दररोजची रात्र हा सुद्धा एक सावलीचाच प्रकार असून अशी ग्रहणे सूर्यमालेत सतत होत असतात.