महाराष्ट्रमुंबई

ठरलं:शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना:ठाकरेंना मिळाली मशाल

मुंबई : आताची घडीची सर्वांत मोठी बातमी समोर येतीये. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. ठाकरेंनी त्रिशुळ आणि उगवता सूर्य चिन्ह मागितलं होतं. पण निवडणूक आयोगाने उपलब्ध चिन्हांच्या यादीत ही चिन्हं नसल्याने संबंधित चिन्हं देण्यास ठाकरेंना नकार दिला. तर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याकडे चिन्हासाठी पर्याय मागितले आहेत. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकून उभ्या राहिलेल्या शिंदे गटाकडून ठाकरे यांच्यावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. उद्धव ठाकरे यांची शक्य त्याठिकाणी कोंडी करण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु होते. शिंदे गटाच्या याचिकेनंतर नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले होते. यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पर्यायी पक्षचिन्हांची यादी सादर करण्यात आली होती. यामध्ये त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य या तीन चिन्हांचा समावेश होता. शिवसेनेकडून रविवारी पर्याय चिन्हांची ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सादर करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिंदे गटानेही यापैकी दोन चिन्हांवर दावा सांगितला. शिंदे गटाकडून सोमवारी आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या पक्षचिन्हांच्या यादीत गदा, त्रिशूळ आणि धगधगत्या मशालीचा समावेश आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाच्या एकंदरित कार्यपद्धतीनुसार एकाच गोष्टीवर दोन पक्षांचा दावा असल्यास संबंधित गोष्ट कोणालाच न देता बाद ठरवली जाते. त्यामुळेत्रिशूळ चिन्ह बाद झालं. तर उगवता सूर्य हे डीएमकेचं चिन्ह असल्याने ठाकरेंना ते चिन्ह निवडणूक आयोगाने नाकारलं.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव व ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून तीन नवे पर्याय देण्यात आले होते. ठाकरे गटाने आपल्या पक्षासाठी ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ या निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. तर नव्या पक्ष नावासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ व ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही नावे नोंदणीसाठी दिली होती. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षनावाबाबत पर्याय दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *