जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले,पाण्याचा विसर्ग सुरु
आशिया खंडातील सर्वात मोठं मातीच धरण असलेल्या जायकवाडी धरणातून गेल्या चार महिन्यात चौथ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली असल्याने धरणाचे 10 ते 27 अशी 18 दरवाजे उघडण्यात आली आहे. सद्या जायकवाडी धरणातून 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु असून, 12 हजार 580 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. तर धरणाचा पाणीसाठा 99.67 टक्के असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
आत्ताची परिस्थिती…
जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 12 हजार 580 क्युसेक
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग : 18 हजार 864 क्युसेक
जायकवाडी धरणात पाण्याचा जिवंत साठा: 2163.771 दलघमी (76.40 टीएमसी)
जायकवाडी धरणाची पाणी पातळी : 463.887 (मीटरमध्ये)
जायकवाडी धरणाची पाणी पातळी : 1521.94 (फुटात)
जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी: 99.67 टक्के
जायकवाडी धरणाचे उघडलेले द्वार संख्या : 18 ( द्वार क्र. 10 ते 27)
यावर्षी चौथ्यांदा दरवाजे उघडले….
यावर्षी सुरवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने 25 जुलैलाच पहिल्यांदा पाणी सोडण्यात आले होते. 25 जुलै ते 03 ऑगस्ट या 9 दिवसांत धरणातून 10.41 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा 08 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या 19 दिवसांत 41.30 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 04 ऑक्टोबर या 38 दिवसांत 148 टीएमसी पाणी जायकवाडी धरणातून सोडण्यात आले. त्यामुळे यावर्षी जायकवाडी धरणात एकूण 211 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, आतापर्यंत त्यातून 156 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा 18 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
माजलगाव धरण 100 टक्के भरले:तीन दरवाजातून विसर्ग,नदीपात्रात सतर्कतेचा इशारा
गुरूवारी सायंकाळी झालेल्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले असून शुक्रवारी धरणातून 1218 क्युसेसने 3 दरवाज्यातून पाणी सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी दररोज आभाळ असलेले ढगाळ वातावरण असायचे, वातावरणात प्रचंड उकाडा असताना पाऊस मात्र हुलकावणी देत होता.
दुसरीकडे माजलगाव तालुक्यात पाऊस समाधानकारक नसला तरी धरणांत पावसाळ्यापूर्वी 27 टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर कार्यक्षेत्रात वडवणी, बीड परिसरात चांगला पाऊस झाल्याने बीडचे बिंदुसरा व उपळीचे धरण शंभर टक्के भरलेले आहे, आता काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दोन्ही धरणांतून उर्वरित येणारे पाणी थेट माजलगाव धरणात समाविष्ट होत आहे तर पैठणच्या नाथसागरचे पाणीदेखील कालव्याद्वारे माजलगाव धरणात दाखल होत आहे, त्यामुळे माजलगाव धरण बाहेरच्या पाण्यावरच 100 टक्के भरले. धरण क्षमता 431.80 दलघमी झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी बारा वाजता 1218 क्युसेसने पाणी 2 दरवाजे 0.10 मीटरने उघडून सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. तत्पूर्वी प्रशासनाचे वतीने उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वर्षा मनाळे यांनी बीडसह, परभणी, नांदेड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पावसाची आणखी शक्यता असल्याने धरणांत पाण्याची आवक वाढल्यास त्याप्रमाणे उर्वरित पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे धरण अभियंता शेख यांनी सांगितले