ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

धनुष्यबाण कुणाचा!धाकधूक वाढली:उद्याच निकालाची शक्यता

धनुष्यबाण चिन्हा संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार काल दसरा मेळावा सुरु असताना शिवसेनेचे पदाधिकारी पुरावे घेऊन दिल्लीत निवडणूक आयोागच्या दारात पोहोचले होते. शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून येत्या काही तासात धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आयोगाचा कौल कोणाच्या बाजूने येणार, याची उत्सुकता दोन्ही गटांसोबतच राजकीय वर्तुळालाही लागली आहे. सोबतच शिंदे आणि ठाकरे गटाची धाकधूकही वाढली आहे.

येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार असून सहा तारखेला मतमोजणी आहे. या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेईल, असा अंदाज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना, घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याची मोकळीक निवडणूक आयोगाला दिली होती.

शिवसेना पक्ष नेमका कोणाचा, धनुष्य बाण या अधिकृत निवडणूक चिन्हावर कोणाचा हक्क आहे, याबाबतचा निर्णय सध्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. येत्या काही तासात धनुष्यबाण चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुराव्याचं काम अजूनही प्रलंबित असल्याची खात्री आयोगाला वाटली, तर निवडणूक आयोगाला धनुष्य बाण हे चिन्ह गोठवावं लागेल, असा अंदाज ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला. परंतु शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही, तर शिवसेनेला (उद्धव ठाकरे) धनुष्यबाण चिन्ह मिळेल, असा अंदाज याआधी उज्ज्वल निकम यांनी वर्तवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *