ठाकरे-शिंदेचा एकमेकांवर घणाघात
होय गद्दारच म्हणणार! मंत्रिपद उद्या जाईल,पण गद्दारीचा शिक्का नाही; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर वार
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या आमदार आणि खासदारांवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख करत समाचार घेतला. ‘महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या सात जणांनी पहिल्यांदा शपथ घेतली त्यामध्ये मी त्यालाही मान दिला होता,’ असं ते म्हणाले. तसंच शिवसेनेतून काही लोकांनी गद्दारी केली, होय गद्दारच म्हणणार. कारण आता त्यांच्या बुडाखाली जरी मंत्रिपदाच्या खुर्च्या चिकटल्या असतील तर त्या एक दिवस निघून जातील. मात्र कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे :
- असा दसरा मेळावा फारच कमी वेळा झाला आहे, हा मेळावा बघून मी भारावून गेलो आहे.
- भाषणासाठी खूप मुद्दे आहेत, पण मी किती बोलू शकेल माहीत नाही. कारण तुमचे प्रेम पाहिल्यानंतर शब्द किती सुचतील सांगता येत नाही.
- मुख्यमंत्री झाल्यानंतर कोणताही अनुभव नव्हता, पण अडीच वर्ष कारभार करून दाखवला.
- हेच ते प्रेम आहे, ज्याने संकटात संरक्षण कवच आहे.
- इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही.
- आज आपण जो रावण जाळणार आहे, तो १० तोडांचा नाही, तर ५० खोक्यांचा आहे. बकासूर नाही, हा रावण खोकासूर आहे, धोकासूर आहे.
आजचा लोकांक्षाचा अंक
निवडणुकीच्या आधी अडीच वर्ष शिवसेनेचा आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असे ठरले होते, हे मी माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन शिवरायांच्या साक्षीने सांगतो. आता जे केले ते तेव्हा का नाही केले सन्मानाने.
शिवसेना संपवायची, खतम करायची. माणसाची हाव किती असते बघा. इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिले, आमदार केले, मंत्रीपद दिले आता मुख्यमंत्री झाला, तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचे आहे. लायकी आहे का? आणि तुम्ही स्विकारणार का अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांचा समाचार घेतला.
शिंदेवर टीका करताना उद्धव ठाकरे एवढ्यावर थांबले नाही. तर पुढे म्हणाले, स्वत:च्या नावाने मत मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद, किमान स्वत:च्या बापाचा तरी विचार करायचा. ते म्हणतील माझ्या ऐवजी दुसऱ्याचे नाव लावतं. स्वत:चे विचार नाहीत म्हणून बाळासाहेबांचे फोटो लावून मत मागायची.
शिंदेंना आज आनंद दिघे आठवले, एकनिष्ठ शिवसैनिकाला जाऊन आज २० वर्ष झाली. आज त्यांचे नाव घेतले जाते कारण ते बोलू शकत नाहीत. दिघे जाताना भगव्यातून गेले हे लक्षात ठेवा.असेही ते म्हणाले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका
मुंबई, 5 ऑक्टोबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बीकेसीच्या मैदानावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ‘तुम्ही कोरोना काळाच सर्वसामान्य गरिबांची दुकानं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमचे दुकानं सुरु होती’, असं धक्कादायक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही दुकानं म्हणजे नेमकी काय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे शंभर कोटी घोटाळ्यांच्या प्रकरणी अजूनही जेलमध्ये आहेत. त्यामुळे शिंदे यांचा रोख नेमका कुणाकडे होता? आणि त्यांनादेखील अशाच कोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं होतं का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे शिंदे यांनी संबंधित आरोप केला असला तरी त्यांनी त्यावर खोलवर भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे ते समजू शकलेलं नाही.
“तुम्ही आज सांगता की भाजपसोबत जायचं होतं तर राजीनामा देऊन जायचं होतं. २०१९ साली जेव्हा तुम्ही महाविकास आघाडी सरकारसोबत गेले तेव्हा तुम्ही राजीनामे दिले होते का? तुम्ही जनादेशाच्या विरोधात गेले. जनतेच्या मनाविरुद्ध तुम्ही गेले. तेव्हा राजीनामे दिले? अडीच वर्षात तुम्ही कितीवेळ मंत्रालयात गेलात? अडीच वर्षात फक्त अडीच तास? कसं सरकार चालणार? कसा कारभार चालणार? तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करुन दुकानं बंद केलीत. मंदिरं बंद केलीत, बाजारपेठा बंद केलात पण तुमची दुकानं मात्र सुरु होती. काय कसली होती ती मी बोलत नाही. पण चालू होतं ते मला माहीत होतं. माझ्याशिवाय जास्त कुणाला माहीत असणार?”, असा धक्कादायक दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
“तुम्ही आम्हाला गद्दार टाहो फोडण्यापेक्षा लाखो शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार-खासदारांनी तुम्हाला का सोडलं? याचं तुम्ही आत्मपरिक्षण करा. तुम्ही आतापर्यंत पाहिलं तर राज ठाकरे, नारायण राणे अनेक लोकं गेले. इथे निहार ठाकरे, स्मिता वैनी बसले आहेत. मग कोण कोण चुकीचं? सगळे आम्ही चुकीचे? तुम्ही एकटे बरोबर? तुम्ही आत्मपरिक्षण करणार की नाही, फक्त चौकटीत राहून सूर्य पश्चिमेला उगवतो सांगायचं आणि ते मानायचं? असं एकनाथ शिंदेंनी कधी केलं नाही. एकनाथ शिंदेने राज्याच्या फायद्याचं सांगितलं ते तुम्हाला आवडलं नाही. परवडलं नाही. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष पूर्ण करायची होती त्यासाठी तुम्ही शिवसेनेचं जे पानीपत होत चाललं होतं ते उघड्या डोळ्याने पाहत होता”, असं शिंदे म्हणाले.
“कुठल्या परिस्थितीत शिवसेना-भाजपचं सरकार आलं ते सर्वांना माहिती आहे. आम्हाला निर्णय घ्यावा लागला तो काही आम्ही आनंदाने घेतला? निर्णय घेताना आम्हालाही वेदना झाल्या, आम्हालाही वाईट वाटलं. गेले अडीच वर्ष जी खदखद होती तिचा उद्रेक कधीतरी होणारच होता. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी जूनमध्ये उद्रेक झाला. त्याची दखल जगातील ३३ देशांनी घेतला. कारण हे परिवर्तन, हा उठाव क्रांती होती. इंग्रजांविरोधात 1857 साली आपल्या लोकांनी जो उठाव केला ती देखील स्वराज्य मिळवण्यासाठी क्रांती होती. त्यामुळे आम्हाला देखील या महाराष्ट्राला अन्यायग्रस्त लोकांच्या जोखडातून मुक्त करायचं होतं. म्हणून आम्ही हे धाडसी पाऊव उचललं. हे पाऊल उचलणं येड्या-गबाळ्याचं काम नाही. हा एकनाथ शिंदे जनतेच्या सेवेसाठी अखंड काम करणारा कार्यकर्ता आहे. मला जीवाची पर्वा नाही. कारण वेडेलोकंच इतिहास घडवतात”, असंदेखील एकनाथ शिंदे म्हणाले.