ज्येष्ठागौरींचे आगमन कधी:पूजा विधी कशी करावी
गणेशाच्या आगमनानंतर ज्येष्ठागौरींचे आगमन होते. शनिवारी (दि. 3) गौरींचे आगमन होणार असून, अनेक घरांमध्ये कुळाचार आणि प्रथेनुसार गौरींची स्थापना केली जाईल.
हे व्रत नक्षत्रप्रधान आहे. भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते. यावर्षी आज (शनिवारी) दिवसभर अनुराधा नक्षत्र असून, त्याच दिवशी वैधृती नावाचा अशुभ योग देखील आहे. त्यामुळे सूर्योदयापासून 16 घटिका म्हणजे 6 तास 24 मिनिटे झाल्यानंतर म्हणजे अंदाजे दुपारी 12 वाजून 46 मिनिटांनंतर गौरींचे आवाहन करावे, असे देशपांडे पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांनी सांगितले. यामध्ये गौरींची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन करावे.
ज्येष्ठा नक्षत्रावर म्हणजे 4 सप्टेंबर रोजी आपापल्या कुळाचारानुसार गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर म्हणजे 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरींचे विसर्जन करावे, असेही देशपांडे यांनी सांगितले.
असे आवाहन…अशा प्रथा!
गौरींचे आवाहन करताना, “गौरी आली, सोन्याच्या पावली’ असे म्हणत गौरींचे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजवण्यात येते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती करून फराळाचा (रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. महाराष्ट्रात सायंकाळी महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम केला जातो. दर्शनाला आलेल्या महिला आणि मुलींचे आदरपूर्वक स्वागत केले जाते. तिसऱ्या दिवशी गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्यात बांधतात. तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते. गौरीपूजनाला महाराष्ट्रात महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसवल्या जातात.