ऑनलाइन वृत्तसेवा

मराठवाड्यात दोन दिवस पावसाचा जोर:राज्यात पुन्हा अतिवृष्टीची शक्यता

मुंबईः पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून, येत्या पाच दिवसांमध्ये नाशिक, पुण्यासह पालघर, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरातही येत्या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसू शकतो. सातारा परिसरामध्ये सोमवारी हा पाऊस अती तीव्र मुसळधार म्हणजे २०० मिलीमीटरहून अधिक नोंदला जाण्याचाही इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मात्र, सांगलीकडे पावसाने अजूनही पाठ फिरवलेलीच दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यात या काळातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सांगली जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक तूट आहे. रत्नागिरीमध्ये पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्येही मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट आहे. रायगड जिल्ह्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी २०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, ठाणे येथेही सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर वाढू शकतो. तर मुंबईत मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातही सोमवार, मंगळवारी पावसाचा जोर अधिक असू शकेल. औरंगाबाद जिल्ह्यासाठी मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे रविवार ते मंगळवार या कालावधीत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विदर्भातही वाढणार जोर
विदर्भातही तुरळक ठिकाणी रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. भंडारा येथे मंगळवारी तर चंद्रपूर येथे रविवारी आणि मंगळवारी, गडचिरोली येथे रविवार ते मंगळवार तर गोंदिया जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी ऑरेंज अॅलर्ट आहे. या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा येथे पुढील याच दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाशिम आणि यवतमाळ येथे शनिवार आणि रविवारी तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *