ऑनलाइन वृत्तसेवापुणे

पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही-कृषि आयुक्त धीरज कुमार

पुणे दि.१५- महाराष्ट्र राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

खरीप-२०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस ३१ जुलै २०२२ आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.

पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहित धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. सदर शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो
मात्र १ ऑगस्ट २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *