नगर पालिका निवडणूक ऑगस्टमध्ये:बीड जिल्ह्यातील नगर परिषदसाठी होणार मतदान
महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी 18 ऑगस्टला मतदान होईल. तर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या निवडणुकादेखील ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होते. या निवडणुका नेमक्या कधी घेतल्या जातील? असा प्रश्न अनेकांना होता. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन या निवडणुकांचा मुद्दा प्रचंड गाजला होता. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप सूटलेला नाही. पण सुप्रीम कोर्टाने या निवडणुकांबाबत महत्त्वाचा आदेश दिला होता. पावसाचं नियोजन करुन आठ-पंधरा दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना कोर्टाने दिला होता. कोर्टाने 10 मार्चला याबाबतचा निर्णय दिला होता. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायचीच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार असल्याने भर पावसात या निवडणुका होण्याची चिन्हं आहेत.