पेट्रोल स्वस्त होणार:आता थेट कामच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकारत लवकर तो निर्णय घेईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मी आणि देवेंद्र फडणवीस मिळून पुढील निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू, असं प्रत्युत्तर दिलं. भाजपचे ११५ आणि माझ्या सोबतचे ५० असे एकत्र राहिल्यास पुढच्या निवडणुकीत २०० आमदार विजयी होऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले. जर, २०० जण निवडून आले नाहीत तर शेती करायला जाईन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवार यांनी अभिनंदन प्रस्तावावर बोलताना शिवसेनेत बंड झाल्यानंतर ज्यांनी बंड केलं ते निवडून येत नाहीत, असं म्हणाले होते. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना उत्तर देत आमचे २०० आमदार निवडून आणणार असं प्रत्युत्तर दिलं.
हिंदुत्वाची ताकद एकत्र आली तर २०० लोक निवडून येतील. भाजपच्या हे केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं. वेगळे राहिलो तर अजित दादांनी १०० प्लसचं टार्गेट ठरवलंच होतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रवादीच्या त्या निर्णयानं आमच्या सगळ्यात चलबिचल होती. आमचे चंद्रकांत पाटील खडसेंच्या आणि पोलिसांच्या भीतीने सहा महिने बाहेरच आहेत. पण आता फडणवीस आणि मी आहोत, घाबरायचं कारण नाही असं त्यांना सांगितलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सत्तेत शिवसैनिकाला काहीच मिळालं नाही. ते माझ्याकडे येऊन रडायचे. मी मोकळाच असल्यामुळे सगळ्यांचं ऐकायचो. या सर्वांना सांभाळायला पाहिजे होतं. सत्तेचा फायदा व्हायला हवा होता. मी एकट्याने माझ्याकडून झालं ते केलं. एकटा तरी काय करणार, एकट्याला मर्यादा येतात, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
या सरकारच्या माध्यमातून प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ५० जण आहोत.. प्रत्येक जण लाखो मतं घेऊन निवडून येतात. सगळ्यांकडे कार्यकर्ते आहेत, सगळे दबंग आहेत, पण ते शस्त्र आम्ही बाहेर काढले नाहीत. कधीच रक्तपात होऊ देणार नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एका मर्यादेपेक्षा जास्त कधीच सहन करता येत नाही. मुख्यमंत्री झालोय हेच मला अजून कळत नाही. लोक कागद घेऊन येतात, मी सही करत नाही, थेट कलेक्टरला फोन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.