मंत्रिमंडळ बाबत कोणतीही चर्चा नाही:अफवांवर विश्वास ठेवू नये-एकनाथ शिंदे
मुंबई: बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आघाडी सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्थापन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची आणि संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली होती, या संदर्भात आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.
आज सकाळी एकनाथ शिंदे गटातील कुणाला मंत्रीपद मिळणार या संदर्भात एक यादी व्हायरल झाली होती. मंत्रिमंडळाबाबत अजुनही आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही, अस एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. ‘भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.’ वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस’,अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.